अण्णाभाऊ साठे हे एका समतावादी विचारसरणीच्या तत्वचिंतकाचं नाव. दुबळ्या, लाचार, दलित, श्रमिकांना जगण्याचं बळ देणारा उपेक्षितांचा नायक. दीनदलितांच्या, कामगारांच्या जगण्याचा वास्तवदर्शी आलेख मांडणारा लोककवी. फसव्या आणि खोट्या स्वातंत्र्याची चिरफाड करून ये आजादी झूठी है देश की जनता भुखी है। असे निडरपणे निक्षून सांगणारा सच्चा कार्यकर्ता.
मूलतत्त्ववाद्यांच्या पारंपरिक विचारांचे विच्छेदन करणारा तत्त्ववेत्ता, बंडखोर कवी आणि विद्रोही साहित्याचा जनक म्हणजेच साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी पूर्वीच्या सातारा आणि आजच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा खेड्यात झाला असला; तरी जागतिक कीर्तीच्या या प्रतिभावंताच्या कर्त्तृत्वानं पुनीत झालेलं वाटेगाव आज जगाच्या नकाशावर झळकतंय !
अण्णाभाऊ हे 1920 ते 1947 या संक्रमण काळाचं अपत्य. 1939 पासून 1947 हा काळ भारतीय राजकारणाचा अतिशय धकाधकीचा आणि विद्रोहाचा काळ होता. संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भाषावार प्रांतरचनेची चळवळ. त्याच वेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होणार म्हणजे नेमकं काय होणार? तर सत्तेचे हस्तांतरण होणार आणि हे हस्तांतरण धर्माच्या ठेकेदारांकडे जाणार. धर्माच्या ठेकेदारांच्या इशाऱ्यावर जनतेला नाचावे लागणार, याचा अदमास कॉम्रेड अण्णाभाऊंना आला होता.
1936 पासून अण्णाभाऊ कम्युनिस्ट पार्टीत प्रचाराचे काम करीत होते. तसे पाहता अण्णाभाऊ वयाच्या 12 व्या वर्षीच 1932 ला क्रांतीसिंह नाना पाटलांच्या बंडात सहभागी झाले होते. 1936 हा काळ जागतिक उलाढालीचा होता. या काळातच स्पेनमधील कामगारांचा लढा अधिकच तीव्र झाला होता. महाराष्ट्रात अण्णाभाऊ कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न शाहिरीद्वारे जनतेसमोर मांडून जनजागृती करीत होते. अण्णाभाऊंनी वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे स्पेनमधील कामगार लढ्याचे मूळ शोधून काढले आणि स्पेनचा पोवाडा लिहून कामगारांना ऐकवला. याच पोवड्याने अण्णाभाऊंना खूप प्रसिद्धी मिळाली. याच वर्षी कम्युनिस्ट पार्टीची धुरा अण्णाभाऊंच्या खांद्यावर आली. हा काळ 1938 चा. अण्णाभाऊंवर पार्टीची जबाबदारी वाढली; परंतु दुर्दैव असे की, याच वेळी अण्णाभाऊंचे वडील भाऊराव साठे निधन पावले. पुढे 1939 ला सौ. कोंडाबाईंसोबत विवाह होवून कुटुंबाची सर्व जबाबदारी अण्णाभाऊंवर आली. कोहीनूर मिलमधील नोकरी सुटली. पुन्हा मुंबईहून वाटेगावी परत व बापू साठ्यांच्या तमाशात प्रवेश. याच वर्षी गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग. 1940 ला कलापथकाद्वारे जनजागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा.
1942 ला “चले जाव’च्या स्वातंत्र्य आंदोलनात अण्णाभाऊ साठे बर्डे गुरूजींसोबत सक्रिय झाल्यामुळे ब्रिटिश सरकारचे पकड वारंट निघाले. वारंट चुकवित महाराष्ट्रभर भ्रमंती करून अण्णाभाऊंचे मुंबईकडे प्रयाण व कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्य आणि अखंडपणे लेखन सुरू होते. याच काळात 22 जून 1941 ला रशियाच्या लाल सेनेने हिटलरच्या सैन्याचा पराभव करून स्तालीनग्राड शहराने विजय संपादन केला. कामगारांच्या सैन्याचा विजय झाल्यामुळे अण्णाभाऊंनी मोरबागच्या गिरणीत काम करता करता “स्तालिनग्राडचा’ पोवाडा रचला आणि पोवाड्याचे अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. अण्णाभाऊंनी ठरवल्याप्रमाणे पार्टीला थोड्याच दिवसांत दोन लाख रुपयांची तरतूद करून दिली. अण्णाभाऊंची प्रामाणिकता, निष्ठा आणि जिद्द टोकाची होती. महाराष्ट्रातल्या कामगारांना रशियन कामगारांच्या कर्त्तृत्वाची प्रेरणा देणारे अण्णाभाऊ केवळ महाराष्ट्र जनतेलाच नव्हे; तर रशियन जनतेलाही परिचित झाले. याच काळात त्यांनी कथा कादंबऱ्यांचे बरेच लेखन केले. रशियन क्रांतीची अनेक पुस्तके वाचून काढली. मनन, चिंतन, लेखन, पार्टीचे काम, शाहिरी असे अनेक ढंगाचे कार्य करून दर्जेदार साहित्यकृतींची निर्मिती केली. हा साहित्यप्रतिभेचा गुण निसर्गदत्त होता. 1945 ला पहिल्या “चित्रा’ कादंबरीचे रशियन भाषेत प्रकाशन व नंतर सुलतान, गुलाम, बरबाद्या कंजारी या कथासुद्धा कादंबरी रूपानं झेक, पोलंड, जर्मन भाषेत प्रसिद्ध झाल्या. साहित्यकृतींच्या उत्कृष्ट दर्जामुळे त्यांना परदेशातून पत्रे येत होती. 1946 ला आवडी, आग, अहंकार, गुऱ्हाळ या कादंबऱ्यांचे लेखन. या काळात अण्णाभाऊंचा कीर्तीध्वज जागतिक स्तरावर फडकला. त्यांना 1948 ला पॅरिस येथे भरणाऱ्या जागतिक साहित्य परिषदेचे निमंत्रण आले. याच वर्षी “मुंबई कुणाची?’ या लोकनाट्याचा मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर संयुक्त महाराष्ट्र परिषदेत प्रयोग झाला.
1950 ते 1956 या काळात “लाल बावटा’ कलापथकावर शासनाने बंदी घातली. अण्णाभाऊंनी माझी मुंबईऐवजी मुंबई कुणाची? याचे लोकनाट्यात रूपांतर केले. 1958 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणामुळे “जग बदल घालूनी घाव’ या गीताची निर्मिती आणि निष्ठांतर. 1958 ला “इनामदार’ या नाटकाचा दिल्ली येथील रंगमंचावर प्रयोग. याच वर्षी मुंबई येथे महाराष्ट्र दलित संमेलनाचे उद्घाटक. 1959 ला फकिरा कादंबरीचे लेखन आणि प्रकाशन. फकिराला 1961 साली महाराष्ट्र शासनाने प्रथम पारितोषिक देऊन अण्णाभाऊंचा यथोचित गौरव केला.
1961 ला इंडोसोव्हिएट कल्चर सोसायटी रशियाचे निमंत्रण. 12 सप्टेंबर 1961 ला अण्णाभाऊंचे रशियाला प्रयाण. ताश्कंद, लेनिनग्राड, मॉस्को, बाकु, स्तालिनग्राड इत्यादी शहरांना भेटी देऊन आल्यावर रशियातील समाजवाद भारतात रुजवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अण्णाभाऊंच्या उर्वरित आयुष्यात 1962 पासून वैफल्यग्रस्तता निर्माण झाली. तरीही प्रतिकूल परिस्थितीत चिरागनगरच्या कुडाच्या झोपडीत अण्णाभाऊ एखाद्या प्रज्ञावंताप्रमाणे दलितांच्या, कामगारांच्या जीवनाची गाथा गुंफत बसायचे. जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांच्या जीवनाची शब्दलेणी कोरणारा शब्दप्रभू शेवटच्या काळात उपाशीपोटी राहून अखंड लिहीत होता. तरीही अण्णाभाऊंच्या सामाजिक जाणीवेचं आणि वैचारिकतेचं मूल्यमापन झालं नाही.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची कामगारांच्या कल्याणाची चळवळ करून श्रमिकांच्या स्वत्वाच्या जाणीव जागृतीसाठी विषमताधिष्ठित समाजव्यवस्थेविरूद्ध क्रांती केली, बंडखोरी केली. श्रमिकांना रशियामधल्या कामगार क्रांतीची प्रेरणा दिली. तरीही अण्णाभाऊंना उपेक्षिताचं जीवन जगावं लागलं. ज्यांनी प्रत्यक्ष संघर्षमय जीवन जगून 20 कादंबऱ्या, 22 कथासंग्रह, 12 चित्रपट कथा, 13 कामगार गीतसंग्रह, 14 लोकनाट्ये, 10 पोवाडे, 3 नाटके, 1 प्रवास वर्णन अशी विपुल साहित्यसंपदा भारतासह रशिया, झेक, पोलंड, जर्मन अशा 27 भाषांत ज्यांचं साहित्य प्रकाशित झालं आणि देशाच्या “चलेजाव’ आंदोलनात व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचं योगदान दिलं, अशा महाराष्ट्र शारदेच्या सुपुत्राला “भारतरत्न’ घोषित करण्याचं मायबाप सरकारनं धाडस करावं एवढीच अपेक्षा !