समाजसेवा घडावी यासाठी धडपडणाऱ्या समाजसेवकांना नेहमी आर्थिक, कौटुंबिक अडचणी खूप असतात. कामातून, नोकरीतून, व्यवसायातून मिळणारा वेळ समाजासाठी जो खर्च करतो तो समाजसेवक असू शकतो. हल्ली समाजसेवा म्हणले राजकारण अशी मांडणी काहीजण करताहेत. या समाजसेवेचा फायदा कोणाला राजकीय हेतू साध्य करुन देतो, पण यातही काहीजण समाजासाठी तत्पर सेवेसाठी कार्यरत असतात. तर काही प्रसिध्दीसाठी कोणाला समाजातील पीडित कुटुंबाचे अश्रू पुसण्यात आनंद असतो. आज मी शिकलो उच्च शिक्षण घेतले. मी आयपीएस ऑफिसर झालो, मी उद्योजक झालो. म्हणजेच आपले पुढील कार्य, कर्तव्य, काय असायला पाहिजे. आज मी यशस्वी झालो पण माझ्या समाजाची परिस्थिती काय आहे. किती समाज साक्षर आहे. निरक्षर आहे. मग मला माझ्या समाजाकरता काही करता येईल का? मी जर उद्योजक आहे तर समाजातील शिक्षण घेत असलेल्या तरुण तरुणींना मी काही मार्गदर्शन करु शकतो का? आजही प्रत्येक समाजातील विद्यार्थ्यांना दहावीनंतर काय शिक्षण घ्यावे व्यवसायिक शिक्षण घ्यावे, विज्ञानशाखेत जावे किंवा आणखी त्याच्यासाठी कोणती योजना असू शकते. आज देशातील प्रत्येक समाजातील प्रतिष्ठीत, व्यावसायिक, नोकरदार वर्ग यांनी दहावी, बारावी नंतर काय शिक्षणपर मार्गदर्शन ठेवले तर विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मार्ग दिसेल. आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजाचे काही तरी देणे लागते ही भावना आपण ठेवून मोठ्या मनाने समाजसेवा केली पाहिजे आपल्या समाजाची एक वेगळी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे. माझ्या समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी मी काय कर शकतो पण आजच्या युगात समाजाने शैक्षणिक गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. समाजसेवा ही राष्ट्रसेवा केव्हा बनेल जेव्हा सर्व जाती धर्मातील वेगवेगळ्या सामाजिक समाजसेवकांनी समाजातील दुर्बल घटकांना सुयोग्य मार्ग दाखवल्यानंतरच सामाजिक उन्नतीचा अभ्यास करुन ज्या गोष्टींची समाजाला आवश्यकता आहे. त्या गोष्टींची माहिती समाजापर्यंत पोहचण्याचे खरे कर्तव्य समाजसेवकांचे आहे. आजचे जीवन धावपळीचे, धकाधकीचे आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीकडे म्हणजे समाजसेवेकडे लक्ष देणे शक्य होणार नाही पण आपण वेळ काढून समाजाला थोडा वेळ दिला तर जे समाजसेवा करत आहेत त्यांना प्रेरणा मिळेल. आपण समाजातील युवक युवतीसाठी सामुहिक परिचय मेळावे घडून आणणे ही काळाची गरज आहे. मुलगी लग्नाच्या वयाची झाली की समाज आठवतो तेव्हा समाजातील लोकांची माहिती घेणे वधूवर परिचय मेळावा घेणाऱ्यांचा शोध घेणे ही काम आपली सुरू होतात. आपण या समाजसेवेमध्ये जर आपला वेळ, कष्ट, आर्थिक साह्य दिले तर आपण समाजाच्या प्रगतीला हातभार लावू शकतो. यासाठी प्रत्येक समाजातील युवकांनी पुढाकर घ्यावा आजच्या पिढीला काय हवे आहे ते लक्षात घेवून काम करावे त्यामध्ये प्रामुख्याने करिअर मार्गदर्शन, समाजातील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार, सामूहिक विवाह मेळावे घेवून या देशाची खरी सेवा करावी. आणि हे कार्य युवक करु शकतात. कारण इतिहास पुरावा आहे जेव्हा जेव्हा सामाजिक परिर्वतन झाले त्यामध्ये युवकांचा सिहांचा वाटा राहिला आहे. क्रांती घडवण्याचे कार्य युवकच करतील हे करत असताना समाजाचे प्रबोधन, व्याख्यान यासारखे उपक्रम घडवणे गरजेचे आहे. प्रबोधनामुळे, अंधश्रध्दा, बुवाबाजीवर आळा घालता येईल. मार्गदर्शनामुळे व्याख्यानामुळे योग्य माहिती समाजापर्यंत जाईल लोकामधये विचाराचे मंथन होईल. विचाराची देवाण घेवाण होईल. शिक्षक, उद्योजक, डॉक्टर, लेखक, वक्ते, पत्रकार, समाजसेवक कसे आपआपल्या सामाजातून घडव्ता येईल याचा अभ्यास प्रत्येक समाजातील लोकांनी करावा ज्या दिवशी हे साध्य होईल त्या दिवशी खरी समाजसेवा हीच राष्ट्रसेवा घडेल.
