श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर  किमान दोन महिला वारकरी सदस्यांची नेमणूक करावी अशी मागणी पंढरपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या व साईरत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.रत्नप्रभा चांगदेव पाटील यांनी ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे-पालवे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मंदिर समितीच्या अस्तित्वापासून येथे पुरुषांचे वर्चस्व असलेले आढळून आलेले आहे. आजतागायत कधीही या समितीवर एखाद्या महिलेची सदस्य या नात्याने नियुक्ती करण्यात आलेली नाही. पंढरीच्या विठ्ठलभक्तांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहेे. पंढरीत येणार्‍या महिला भाविक भक्तांच्या सोयी-सुविधांबाबत आणि अडी-अडचणींबाबत चे सर्व निर्णय एक महिलाच घेवू शकते, जर समितीवर वारकरी महिलांची नियुक्ती झाली तर महिला भाविक-भक्तांच्या विविध समस्या सोडविण्याबाबतचे निर्णय घेणे समितीला अधिक सुकर होईल.  तेंव्हा याचा सारासार विचार करुन यावेळी मंदिर समितीवर वारकरी महिला सदस्यांची नियुक्ती करावी असे या निवेदनात म्हटले आहे.


         नुकताच ना.पंकजाताई मुंडे-पालवे यांचा पंढरपूर दौरा झाला. यावेळी सौ. रत्नप्रभा पाटील यांनी त्यांच्याशी सुसंबाद साधला. तेंव्हा महिला सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना, बेरोजगारांना रोजगारांच्या संधी व पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर महिला सदस्यांची नियुक्ती याबाबत चर्चा करुन निवेदन दिले.

शासनस्तरावर महिलांच्या सुरक्षिततेबाबत उदटासिनता दिसते, सध्या राज्यात वारंवार महिलांवर होणार्‍या अत्याचारात वाढ झालेली आहे. कित्येक निष्पाप कोवळ्या बालिकांवरही क्रुरपणे अत्याचार घडल्याचे प्रकार निंदनीय आहेत. अशा परिस्थितीत याबाबत कठोरातील कठोर शासन असणारा कायदा आमलात आणावा जेणेकरुन समाजातील अपप्रवृत्तींना वेळीच ठेचता येईल आणि असे गुन्हे करण्यास कुणी धजावणार नाही. याबाबत आपण स्वत: एक महिला या नात्याने पुढाकार घेवून विचार करावा असेही या निवेदनात म्हटले आहे. 
  राज्यावर पसरलेल्या दुष्काळाच्या सावटामुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे, येथील सुशिक्षीत बेरोजगार युवावर्ग दिशाहीन झालेला आहे, येथील मजुरांच्या हाताला काम नाही यामुळे वैफल्यग्रस्त युवावर्ग व्यसनाधिनतेकडे आणि गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहे.  या गंभीर बाबीकडे लक्ष घालून गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला एमआयडीसीचा प्रश्‍न मार्गी लावून यामध्ये विविध उद्योग उभारणीसाठी शासन स्तरावरुन प्रयत्न व्हावेत अशा प्रमुख मागण्या या निवेदनाद्वारे ना.पंकजाताई मुंडे-पालवे यांच्याकडे सौ.रत्नप्रभा पाटील यांनी केल्या आहेत. 
  यावेळी त्यांच्यासोबत संतोष गाडे, अनिल बोराडे व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top