पंढरपूर येथील साईरत्न बहूउद्देशिय संस्था यांच्या माध्यमातून व श्री.खरात यांच्या पुढाकाराने रणरागिणी रत्नप्रभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इतर मागासवर्गीय महामंडळ, सोलापूर यांच्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शनपर मेळावा समता नगर येथे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.पी. साळसकर , वसुली निरीक्षक दिनेश चव्हाण, अभिषेक खांडेकर व सामाजिक कार्यकर्त्या सौ.रत्नप्रभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.


                   या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना श्री. साळसकर यांनी इतर मागासवर्गीय महामंडळासह विविध महामंडळांच्या कर्ज  योजना विस्तृतपणे सांगितल्या. या योजनांचा लाभ समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहचलाच पाहिजे, बिज भांडवल कर्ज योजना,  बचतगटाच्या मा
ध्यमातून ही महामंडळाच्या योजना खुल्या प्रवर्गासाठी सुध्दा आहेत. त्याचाही लाभ खुल्या प्रवर्गातील लोकांनी घ्यावा असे आवाहन साळसकर यांनी यावेळी केले. कोणत्याही योजनेसाठी किमान 18 ते कमाल 50 वयोमर्यादा आवश्यक आहे. ही महत्वाची बाब त्यांनी नमुद केली.
            
                  साईरत्न बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ.रत्नप्रभा पाटील  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना या योजनांचा लाभ समाजातील आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत पोहचलाच पाहिजे व यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आपण करु अशी ग्वाही दिली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, यासाठी महिलांनी या योजनांची सर्व माहिती आत्मसात करावी व  विविध योजनांद्वारे मिळणारी आर्थिक मदत मिळवून त्याचा योग्य विनीयोग करुन आपला स्वत:चा एखादा छोटासा उद्योग व्यवसाय करावा असे नमुद केले. आजच्या धकाधकीच्या काळात कुटूंबाच्या गरजा वाढलेल्या आहेत यासाठी महिलांनी आपला व्यवसाय चालू करुन कुटूंबाला आर्थिक सक्षमीकरणासाठी हातभार लावावा असेही त्या म्हणाल्या.

                 या मार्गदर्शन मेळाव्यात अनेक लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार सौ.कल्याणी पेटकर यांनी मानले.

 
Top